नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) १४ आणि गोव्यातील २ असे एकूण १६ विद्यार्थी-विद्यार्थिनी दिल्लीत सराव करीत आहेत. यावर्षी प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या वतीने एनएसएस सराव शिबिराला येथील चाणक्यपुरी भागातील इंटरनॅशनल यूथ होस्टेलमध्ये १ जानेवारी २०२० पासून सुरुवात झाली आहे. देशभरातील १५ विभागांमधून एकूण २०० एनएसएसचे विद्यार्थी- विद्यार्थिनी या शिबिरात सहभागी झाले आहेत. पश्चिम (पुणे) विभागात समावेश असणाऱ्या महाराष्ट्रातून ७ विद्यार्थी आणि ७ विद्यार्थिनी तर गोव्यातून प्रत्येकी १ विद्यार्थी आणि १ विद्यार्थिनी असे एकूण १६ विद्यार्थी-विद्यार्थिनी या शिबिरात सराव करीत आहेत.. हे शिबीर ३१ जानेवारी २०२० पर्यंत चालणार असून यामध्ये दररोज सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत योगासने, बौद्धिक सत्र, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पथसंचलनाचा सराव करण्यात येतो अशी माहिती शिबिराचे संचालक डॉ. अशोक श्रोती यांनी दिली. 'एक भारत श्रेष्ठ भारत' या केंद्र शासनाच्या कार्यक्रमांतर्गत शिबिरामध्ये महाराष्ट्र आणि ओडिशाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्या राहण्याची व्यवस्था एकत्र करण्यात आली असून उभय राज्यांतील सांस्कृतिक, सामाजिक आदींविषयी माहिती समजून घेण्यात त्यांना मदत होणार असल्याचेही डॉ. श्रोती यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या चमूत पुणे येथील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाची वैष्णवी पटोले, औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची तेजस्विनी वानखेडे, मुंबई येथील एस.बी. वर्तक महाविद्यालयाची संप्रिती जयंता, मुंबई येथील एसआयइएस कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची नितीशा कदम, औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज येथील दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाची पूजा पवार, अकोला येथील श्रीमती एल.आर.टी. वाणिज्य महाविद्यालयाची सपना सुरेश, मुंबई येथील ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची अक्षता कदम या विद्यार्थिनींचा समावेश आहे.
महाराष्ट्र एनएसएसच्या १४ विद्यार्थ्यांचा राजपथ पथसंचलनासाठी दिल्लीत सराव
• BAHUTANCHI ANTARE